श्रीगोंदा, दि. 25 (प्रतिनिधी)- घरगुती कारणावरुन तसेच लग्नातील वस्तु व पैशाची मागणी करुन विवाहितेला मारहाण करत बळजबरीने विषारी औषध पाजुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तालुक्यातील पेडगाव येथील विवाहितेचा पती करण नवनाथ दिवटे, सासरे नवनाथ दिवटे, सासु आशा दिवटे व दिर अर्जुन दिवटे या चार जणांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विवाहितेचे वडिल राजेश शांताराम काळोखे (रा.पवई, मुंबई) यांचे फिर्यादीवरून गुन्हा करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी यांची मुलगी प्रियांका हीचे तालुक्यातील पेडगाव येथील करण नवनाथ दिवटे याच्याशी लग्न झाले होते. मागील सहा महिन्यापासून प्रियांका हीचा पती करण याने तिला तुझ्या आई-वडीलानी लग्नामध्ये काही वस्तु व पैसे दिले नाहीत, असे सांगत तिला मारहाण करीत. तिला माहेरी पाठविण्याची धमकी देत होता. तसेच दारु पिवुन प्रियंका हिचे चारित्र्यावर संशय घेवुन, शिवीगाळ करून मारहाण केली.
मारहाणीबाबत काही विचारण्यासाठी फोन केला असता करण याने पेडगाव येथे आलात तर तुम्हाला जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. दि. 20 जून रोजी करण याने प्रियंका हिला विषारी औषध पाजुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
प्रियंका हिच्यावर अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून चारित्र्यावर संशय घेवुन, शिवीगाळ तसेच मारहाण मारहाण करत विषारी औषध पाजल्याच्या कारणावरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत.