मुंबई – संततधार पावसामुळे मुंबईत इमारत कोसळण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. विले पार्ले येथे दुपारी अडीच वाजता एका इमारतीचा भाग कोसळला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती आहे.
मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पावसाच्या दुसऱ्याच दिवशी विले पोर्ले येथे इमारत कोसळली आहे.
नानावटी रुग्णालयाजवळील जी+2 इमारत कोसळली. मुंबई पोलीस आणि अग्निशामन दलाने शर्तीचे प्रयत्न करत तिघांचा जीव वाचवला. या घटनेत 65 वर्षीय प्रिशिला मिसाईटा आणि 70 वर्षीय रोबी मिसाईटा यांचा मृत्यू झाला आहे.
तसेच मुंबईतील घाटकोपर येथील दुमजली इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विद्याविहारमधील राजावाडी कॉलनी येथील इमारतीचा भाग कोसळला.
दुर्घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफ दाखल झाले आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती असून, त्यांचा शोध सुरू आहे. रविवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. ही इमारत 40 वर्ष जुनी असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये शनिवारपासून ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे इमारतीचा भाग खचल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. माजी शिक्षणमंत्री आणि मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी दुर्घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.