नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल एका प्रकरणामुळे चांगलीच अडचणीत सापडली आहे. अभिनेत्रीला सध्या कोर्टाच्या चकरा माराव्या लागत असलयाचे समोर आले आहे. शनिवारी अमिषा पटेल फसवणूक प्रकरणात हजर राहण्यासाठी रांची सिव्हिल कोर्टात पोहोचली होती यावेळी तिने कोर्टासमोर सरेंडर केल्याचे देखील समजते.
चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिचा बिझनेस पार्टनर कुणाल गुमर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे घेऊन म्युझिक अल्बम न बनवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याशिवाय त्याच्यावर फसवणूक आणि धमकावल्याचाही आरोप आहे.या प्रकरणी रांची सिव्हिल कोर्टाने अभिनेत्रीला कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते, मात्र ती कोर्टात हजर राहिली नाही. त्यानंतर न्यायालयाने तीच्याविरुद्ध वॉरंट जारी केले.
कोर्टात हजर झाल्यानंतर अमिषा पटेलला 21 जूनपर्यंत सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २१ जून रोजी होणार आहे. अमिषा पटेल यांनाही हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. म्हणूनच आज पार पडलेल्या सुनावणीसाठी अभिनेत्रीने कोर्टात हजेरी लावली होती. विशेष म्हणजे यावेळी अमिषा आपला चेहरा पूर्णपणे कव्हर करून न्यायालयात दाखल झाल्याचे बोलले जात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
अरगोरा येथील रहिवासी अजय कुमार सिंह यांनी 17 नोव्हेंबर 2018 रोजी सीजेएम कोर्टात हे प्रकरण दाखल केले होते. अमिषा पटेलने अजय कुमार सिंह यांच्याकडून म्युझिक मेकिंगच्या नावाखाली अडीच कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे, मात्र त्यानंतर तिने संगीत निर्मितीसाठी कोणतेही काम सुरु केले नसल्याचे तक्रारदार यांचे म्हणने आहे.
यासोबतच अमिषा पटेलवर ‘देस मॅजिक’ चित्रपट बनवण्याच्या नावाखाली अजय सिंहकडून अडीच कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. करारानुसार, जेव्हा चित्रपट जून 2018 मध्ये प्रदर्शित झाला नाही तेव्हा अजयने पैशांची मागणी केली.अमिषाच्या वतीने दिरंगाई केल्यानंतर ऑक्टोबर 2018 मध्ये अजय सिंगला 2.5 कोटी आणि 50 लाख रुपयांचे दोन धनादेश देण्यात आले होते, जे बाऊन्स झाले. यानंतर अजय सिंहने अभिनेत्रीवर खटला दाखल केला.