बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान आणि आलिया भट्टची जोडी 2016 मध्ये “डियर जिंदगी’ चित्रपट पहिल्यांदा झळकली होती. या चित्रपटात शाहरुखने कौन्सलरची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून शाहरुख-आलियाच्या जोडीला खूपच प्रसिद्धी मिळाली होती.
यानंतर पुन्हा एकदा या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. आता पुन्हा एकदा आलिया आणि शाहरुख खान एकत्रित काम करणार असल्याचे समजते. परंतु यावेळी शाहरुख खान हा चित्रपट निर्माता म्हणून काम करणार आहे. शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेन्मेंटने खास महिलांवर कॉमेडी चित्रपट साकारण्याचे प्लानिंग केले आहे. ज्यात आलिया मुख्य भूमिका साकारणार आहे.
आलिया भट्टला ही स्क्रिप्ट आवडली असून या प्रोजेक्टसाठी ती खूपच उत्सुक आहे. परंतु चित्रपटाच्या अंतिम स्क्रिप्ट वाचण्याच्या प्रतीक्षेत आलिया आहे. हा चित्रपट महिलांवरील कॉमिक ड्रामावर आधारित आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास आलिया भट्टचा “सडक-2′ लवकरच प्रदर्शित होणार आहे.
यात आलियासोबत आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले आहे. याशिवाय आलिया ब्रह्मास्त्र, गंगूबाई काठियावाडी आणि आरआरआर चित्रपटात झळकणार आहे.