मांडवगण येथील घटना ः श्रीगोंदा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल
श्रीगोंदा (शहर प्रतिनिधी) –किरकोळ वादातून भाच्यानेच मामाचा खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील मांडवगण येथे घडली. हा प्रकार गुरुवारी (दि.27) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी मृताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कानिफनाथ संपत गांगर्डे (वय 85, रा. मांडवगण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृताचा मुलगा मंगेश कानिफनाथ गांगर्डे (रा. हल्ली वडगाव शेरी, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे वडील आपल्या शेतात असलेल्या घरात एकटे राहत होते. दोन महिन्यांपासून माझा आत्याचा मुलगा मंगेश सोमनाथ केदारी (मूळ रा. हडपसर, हल्ली, रा. मांडवगण) पुणे येथून गावाकडे राहायला आला आहे. तोही माझ्या वडिलांसमवेत शेतातील घरात राहात होता.
गुरुवारी (दि. 27) सायंकाळी 7 वाजता माझे चुलते गणेश गांगर्डे यांनी आपणास दूरध्वनीवरून आपले वडील व मंगेश केदारी यांच्यात भांडण झाल्याचे सांगितले. त्यानंतर आपण शेजारील अतुल काळे यांना दूरध्वनीकरून याविषयी माहिती घेतली असता, त्यांनी वडील कानिफनाथ व मंगेश केदारी दोघे मांडवगण येथून दारू पिऊन आले होते. त्यांच्यात त्यानंतर भांडणे झाली. यावेळी मंगेश केदारी याने लाकडी दांडके वडील कानिफनाथ गांगर्डे यांच्या डोक्यात मारले.
भांडणाची माहिती मिळाल्यावर आपण तातडीने पुण्याहून गावाकडे आलो. यावेळी वडील मृतावस्थेत पडलेले दिसले. तेथे मंगेश केदारीही होता. त्यानेच आपणच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने वडील कानिफनाथ यांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. मंगेश गांगर्डे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मंगेश केदारी याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.