सातारा -शहराच्या मध्यवर्ती भागातील कोटेश्वर मैदानावर मद्यपींचा ओपन बार भरत असून त्याचा त्रास लगतच्या नागरिकांना होत आहे. लॉकडाऊन असतानाही कोटेश्वर मैदानावर रोज रात्री दारुच्या पार्ट्या रंगत असून मैदानावर दारुच्या बाटल्यांचा खच पडत आहे. विशेष म्हणजे हे मैदान प्रतिबंधित क्षेत्राला लागून असतानाही असे गैरप्रकार येथे चालतातच कसे, असा प्रश्न असून पोलिसांनी याची गांभिर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे.
देश, राज्य, जिल्हा संकटात असताना मद्यपींना मात्र त्याचे सोयरसुतक दिसून येत नाही. प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी कायदे, नियम तोडायचे कसे याचा प्रत्यय वारंवार येत आहे. पोलिस प्रशासन बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा काही मद्यपींनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्याचा प्रत्यय शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या कोटेश्वर मैदानावर दररोज येत आहे. या मैदानाच्या लगत असणारे विद्युत दिवे टिकून दिले जात नाहीत. या परिसरात शाळा, मंदिरे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करुन मद्यपी याठिकाणी दारुच्या पार्ट्या झोडत आहेत.
या परिसरात असणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीने मैदानाला संरक्षक भिंत उभारली आहे. सीसीटीव्ही कॅमरे, विद्युत दिवे बसवण्यात आले आहेत. मद्यपींचा वावर वाढल्याने विद्युत दिवे, सीसीटीव्हीचीही तोडफोड करण्यात येत आहे. जिल्ह्यात बुधवारपासून दारुची दुकाने खुली झाली. त्याच रात्री कोटेश्वर मैदानावर मद्यपींची जंगी पार्टी झाली. येथे रात्री उशिरापर्यंत मद्यपींचा धुडगूस सुरु होता. विशेष म्हणजे हे मैदान प्रतिबंधित क्षेत्राला लागून असतानाही याठिकाणी मद्यपी एकत्र जमतातच कसे असा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत पोलिस प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.