अकोला – अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना मृत तरूण तिरडीवर उठून बसल्याचे वृत्त गुरुवारी समोर आले होते. या घटनेची राज्यभर चर्चा झाली. अनेकजण हा चमत्कार असल्याचे समजत होते. मात्र हा कोणताही चमत्कार नसून याप्रकरणी पोलिसांनी आता त्या तरूणासह एका बाबावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा गावात राहणारा प्रशांत मेसरे (वय 25) हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर डाॅक्टरांकडून उपचार सुरु होते. मात्र प्रशांतवर कोणीतरी काळी जादू केल्याच्या संशयातून त्याच्या कुटुंबीयांनी गावातीलच एका 21 वर्षीय कथित बाबाकडून त्याच्यावर तंत्र-मंत्राने उपचार सुरु केले.
बुधवारी मसरे कुटुंब प्रशांतसह बुलढाण्यातील अमरापूर येथे देवदर्शनासाठी जात होते. यावेळी प्रशांतची तब्बेत जास्त बिघडली. त्यानंतर त्याला खामगाव येथील डाॅक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. डाॅक्टरांनी तपासणी करून सलाईन लावले. त्यानंतर प्रशांतच्या कुटुंबीयांनी त्याला घरी आणले. काही वेळाने त्याची हालचाल बंद झाली. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर त्याला तिरडीवर ठेवण्यात आले आणि अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना गावातील बाबाकडे नेले. बाबाने मंत्रोपचार केले आणि काही वेळात प्रशांत तिरडीवर उठून बसला. बाबांच्या चमत्काराची चर्चाही वाऱ्यासारखी पसरली.
मात्र चान्नी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महाजन यांना संशय आला.त्यांनी गावात जाऊन विचारपूस केली असता संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी प्रशांतच्या कुटुंबियांना काही प्रश्न विचारले असता ते निरूत्तर झाले. डाॅक्टरांनी मयत घोषित केल्याचा पुरावाही त्यांच्याकडे नव्हता. त्यानंतर त्या बाबाला पोलिस ठाण्यात नेले. दरम्यान, प्रशांत हा मयत झालाच नव्हता. त्यामुळे बाबाच्या चमत्काराची अफवा पसरवल्याने आणि इतर प्रकरणी प्रशांत, त्याचे कुटुंबिय आणि बाबावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, काल गुरुवारी प्रशांतला अंत्यसंस्कारासाठी नेत असताना तो तिरडीवर उठून बसल्याची वार्ता राज्याभरात वेगाने पसरली होती. तसेच त्यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र आता हे सर्व प्रकरण स्पष्ट झाले असून तो मयत झाला नव्हता. कोणताही चमत्कार झालेला नाही हे स्पष्ट झाले आहे.