तरटे, पवार, खिलारी यांची टीका, पुणेवाडीच्या वीज उपकेंद्राशी विखेंचा संबंध काय?
पारनेर – आ. नीलेश लंके यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाठपुरावा करून पुणेवाडी येथील वीज उपकेंद्र मंजूर करून घेतले. या कामाशी पालकमंत्री विखे यांचा काडीचाही संबंध नसून स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी विखे पिता-पुत्रांची केविलवाणी धडपड सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, नीलेश लंके प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार, प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी केली आहे.
पुणेवाडीच्या वीज उपकेंद्राचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज (शनिवार) लोकार्पण केले. विखे यांच्या या कृतीवर तरटे, पवार व खिलारी यांनी आक्षेप घेतला आहे. हे काम विखे यांनी मंजूर करून आणले असते तर त्याच्या लोकार्पणाचा त्यांना निश्चित अधिकार होता. मात्र, काडीचाही संबंध नसताना श्रेय लाटण्याची धडपड करणे हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले.
आ. लंके यांनी केलेल्या तत्कालीन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यासंदर्भात सर्व कागदपत्रे प्रशासनकडेही उपलब्ध आहेत. या कामासाठी विखे यांचे एक तरी पत्र आहे का? असा सवालही करण्यात आला. जिल्हा परिषद, तसेच जिल्हा नियोजन मंडळ वगळता खा. सुजय विखे यांनी गेल्या साडेचार वर्षांत किती निधी तालुक्याला दिला हेदेखील विखे यांनी जाहीर करावे. विखे यांच्या चार पिढ्या तालुक्यात राजकारण करीत आहे. या चार पिढ्यांचे तालुक्यासाठी योगदान काय? सुजय विखे दक्षिणेत निवडून आले. मात्र, राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांना घेऊन ते उत्तरेत जातात. शासन आपल्या दारी, पशुसंवर्धन विभाग आदी कार्यक्रमही त्यांना उत्तरेत घ्यावेसे वाटतात, अशी टीका तरटे, पवार, खिलारी यांनी केली.
निवडणुका जवळ आल्याने विखे पिता-पुत्रांचे पारनेर तालुक्याचे दौरे वाढले आहेत. तीन दिवसांत ते तीनदा तालुक्यात आले आहेत. महसूलमंत्री हे राज्याचे आहेत की पारनेर तालुक्याचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
– बाळासाहेब खिलारी
निधीत फेरफार
प्रशासनावर दबाव आणून जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या निधीचा आराखडा बदलून विखे यांनी ९० टक्के निधी राहाता तालुक्यात नेला. पारनेर येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमास गर्दी जमविण्यासाठी कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी, पुरवठा अधिकारी, नगरपंचायत यांना वेठीस धरण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला.