प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 28 -एखाद्या ठिकाणी दुर्घटना अथवा अपघात झाल्यास नागरिकांना “आधी मदत करा, हद्द नंतर बघा’ अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांना सूचना दिल्या.
चांदणी चौक येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. चांदणी चौक येथे पुणे व पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या हद्दीचा भाग येतो. त्यामुळे या ठिकाणी अपघात झाल्यास हद्दीचा वाद निर्माण होतो. त्यामुळे मदत पोलिसांकडे मागितली तर पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस एकमेकांवर जबाबदारी ढकलतात. या विषयी विचारले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, दुर्घटनेतील नागरिकांना तत्काळ मदत करणे आवश्यक आहे. नागरिकांना आधी दिलासा द्या, त्यांना मदत करा, हद्द नंतर बघू, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. यापुढे असा गोंधळ होणार नाही.
चांदणी चौक येथे सध्या असलेला पूल तोडून काही काम करावे लागणार आहे, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. हे काम होईपर्यंत सोमवार (दि.29) पासून 100 वाहतूक कर्मचारी वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी असतील.
अवजड वाहतूक पण व्यवस्थित केली जाईल. कालच सर्व सूचना देऊन कार्यवाही करून काम होईल. त्यामुळे वाहतूक कोंडी आता लवकरच सुटेल. तसेच पूर्वी काही झाले ते विसरून जा. पुढच्या 15 दिवसांत सगळं व्यवस्थित सुरू करू. येथे काही समस्या आहेत. ज्या शंभर टक्के सुटणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
पूल पाडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान
चांदणी चौकातील उड्डाणपूल 12 ते 15 सप्टेंबर 2022 या दरम्यान पाडण्याचे नियोजन आहे. हा पूल पाडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी नोएडा येथील इमारत ब्लास्टिंगद्वारे रविवारी पाडण्यात आली. याच कंपनीचे अधिकारी येत्या मंगळवारी किंवा बुधवारी पुण्यात येत आहेत. ते या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.