काबूल – तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी तो देश सोडून परांगदा झाले. हेलिकॉप्टरमध्ये रोकड भरून त्यांनी देशाबाहेर उड्डाण केले. यातच तालिबानने अफगाणचा ताबा घेतल्यानंतर अफगाणी नागरिकही देश सोडतांना दिसून आले. काबूल विमानतळावरील प्रचंड गर्दी ही तालिबानच्या अराजकतेची साक्ष देत आहे.
यातच आता अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घानी यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर आता त्यांचे भाऊ हशमत घानी अहमदजई यांनी तालिबानचा हात पकडला आहे. हशमत घनी हे तालिबानमध्ये दाखल झाल्याचे वृत्त आले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, तालिबानला पाठिंबा देण्याचा निर्णय हशमत घनी अहमजदई यांनी अल्हाज खलील-उर-रहमान हक्कानी याच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर घेतला आहे. या बैठकीनंतर त्यांनी आपण तालिबानला पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली आहे.