मुंबई – मागील काही दिवसांपासून ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. येत्या 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भगवान श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे. ‘आदिपुरुष’चं पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टिझर नंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळाले.
या चित्रपटातील सर्वच गाणी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. तिकिटांच्या आगाऊ बुकिंगची बातमी सतत सुरू आहे. ‘आदिपुरुष’ पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी लोक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे वळणार आहेत. पहिल्याच दिवशी ‘आदिपुरुष’ अनेक विक्रम मोडू शकतो, अशी सध्या परिस्थिती पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत हिंदी आणि तेलगू भाषेत 4,79,811 तिकिटे बुक करण्यात आली आहेत. चित्रपट समीक्षकांच्या मते आदिपुरुष रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर त्सुनामी येणार आहे. गेल्या शुक्रवारी PVR मध्ये 1 लाख 26 पेक्षा जास्त तिकिटे बुक करण्यात आली होती. तर INOX मध्ये 96,502 तिकिटे बुक करण्यात आली होती. मात्र, सायंकाळपर्यंत ही आकडेवारी वाढणार असल्याचेही मानले जात आहे.