निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि मांढरदेवीकडे जाताना लागणारे भोर तालुक्यातील प्रमुख गाव भाबवडी. गाव छोटे असले तरी अत्यंत स्वच्छ, सुंदर, गाव रस्त्यांचे झालेले कॉंक्रिटीकरण आणि इतर नागरी सुविधा पाहिल्या की गावाचे विकासाच्या दृष्टीने असलेले वेगळेपण लक्षात येते. अर्थात, याचे श्रेय येथील विद्यमान सरपंच अमर धर्माजी बुदगुडे यांना जाते. त्यांच्या सरपंचपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामपंचायतीमधील इतर सदस्यांना सोबत घेऊन विकासाचा चांगला टप्पा गाठला आहे आणि अजून अडीच वर्षे बाकी असल्याने पुढील कामाचे नियोजनही त्यांचे झाले आहे.
भोर तालुका हा सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आहे. तालुक्याचा राजकीय अभ्यास केला तर येथे तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. मात्र, भाबवडी गाव त्याला अपवाद आहे. अमर बुदगुडे हे भाजपचे भोर तालुक्यातील एकमेव सरपंच आहेत. मात्र, विजेतेपदाने हरखून न जाता त्यांनी गावाचा विकास हाच उद्देश समोर ठेवला असल्याने पक्षापेक्षा काम करणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख गावात अधिक आहे.
गेल्या आठ वर्षांचा त्यांना राजकीय कार्याचा अनुभव आहे. भाजप युवा मोर्चाचे भोर तालुका अध्यक्षपद ते खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यमान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात समर्थपणे भूषवत आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने विकासावेळी भेदभावाला जागा उरली नाही. त्यांनी शासनाच्या दारूबंदी कमिटीवरदेखील काम केले आहे. या कमिटीच्या माध्यमातून त्यांनी अवैध दारूबंदी मोहीम संपूर्ण तालुक्यामध्ये यशस्वीरीत्या राबवून 90 टक्के दारूबंदी करण्यास ते यशस्वी ठरले आहेत.
5 रुपयांत 20 लिटर पिण्याचे शुद्ध पाणी योजनेचा सकारात्मक परिणाम
गावात रोटरी क्लबच्या माध्यमातून 5 रुपयांना 20 लिटर शुद्ध पाणी ही योजना राबवण्यात येत असून, त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. त्याचा परिणाम म्हणजे गावातील रोगराई कमी झाली आहे, पाण्यावाटे होणाऱ्या आजारांवर निर्बंध लागले आहेत. अमर बुदगुडे सांगतात की, अनेकवेळा पाण्यातून आजाराचा संसर्ग होत असतो. शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळाले तर त्याचा परिणाम चांगल्या आरोग्यावर होतो. गावातील नागरिकांसाठी आणि पर्यायाने गावाच्या आरोग्यासाठी या योजनेचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र सरकारच्या “हर घर जल’ या योजनेच्या कार्यास आरंभ
गावामध्ये नागरिकांना 24 तास स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन या योजनेसाठी 1 कोटी 16 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला असून योजनेचे काम प्रगतीपथावर असून लवकरच ही योजना पूर्ण होणार आहे.
लोकसंपर्कात राहण्याची आवड
अमर बुदगुडे यांचा लोकसंपर्क मोठा आहे. लोकांमध्ये राहून लोकांशी एकरूप होणारा हा नेता आहे. वाढदिवसापासून लग्नकार्यापर्यंत आणि अगदी सांत्वनापर्यंत प्रत्येकाच्या सुख-दुःखात ते सहभागी होत असतात. लोकसंपर्क वाढवणे हाच त्यांचा छंद आहे आणि त्या दृष्टीने गावातीलच नाही तर इतर ठिकाणीही त्यांचा मोठा मित्रपरिवार, हितचिंतक आहेत. याचा फायदा त्यांना त्यांच्या कामात होतो आहे.
तालुक्यातील 14 गावांना जिमचा फायदा
तरुण मुलांना व्यायामाची सवय लागावी व निरोगी आरोग्यासाठी गावात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या फंडातून 7 लाख रुपये किमतीचे जिमचे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. अमर बुदगुडे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींना जिमचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. परिसरातील 14 गावांतील तरुण-तरुणींना याचा फायदा झाला आहे. या सर्वांनी यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे. याबरोबरच पालकमंत्री निधीमधून गावासाठी आतापर्यंत दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
शिक्षणाची आवड आणि इतर पदे
अमर बुदगुडे हे स्वतः उच्चशिक्षित असून एम. कॉम. जी.डी.सी. ऍण्ड ए. ही पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. कॉम्प्युटरची त्यांना चांगली जाण आहे आणि त्याच माध्यमातून भोरमध्ये अउअजऋ उजचझणढएठ ही शिक्षण संस्था गेली सात वर्षे ते समर्थपणे चालवत आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून जॉब देतात. त्यामुळे त्यांच्या या क्लासची लोकप्रियता परिसरात चांगली असून त्यांच्या माध्यमातून साधारणतः 450 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे.
ग्रामसंवाद सरपंच संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस म्हणून ते काम पाहात आहेत. याचबरोबर सरपंचांना काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ते मोलाचे काम करीत आहेत. राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, पाटोदा येथे गावातील शेतकरीवर्गाचा अभ्यासदौरा करून त्या धर्तीवर भाबवडी गावाचा विकास करण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांच्या या कार्यात त्यांना पत्नी पूजा यांचा आणि प्रा. रमेश बुदगुडे यांचा चांगला पाठिंबा मिळत आहे.
राजकीय, सामाजिक उपक्रमांत त्यांचाही सहभाग आहे. महिलांच्या विविध कार्यक्रमांतील त्यांची उपस्थिती, त्यांचे प्रबोधन हे येथील महिला गटांसाठी उपयुक्त ठरत आहे. ग्रामपंचायतीच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन या सर्वांच्या सहकार्याने अमर बुदगुडे याच पद्धतीने कार्य करीत पुढील अडीच वर्षांचा कार्यकाळ जनसामान्यांच्या मनावर ठसा उमटवणारा करणार आहेत, यात शंकाच नाही.
विविध विकासामांचा धडाका
गावामध्ये आतापर्यंत भैरवनाथ मंदिराच्या परिसरात कार्यक्रमासाठी स्टेज उभारणे, मंदिरासमोर ब्लॉक्स बसविणे, अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करणे, बंदिस्त गटर योजना, स्मशानभूमी सुशोभिकरण आदी विकासकामे करण्यात आली आहेत. याचबरोबर सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, जलजीवन मिशन योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. गावामध्ये अंगणवाडी शाळेमध्ये बोलकी अंगणवाडी ही संकल्पना राबवण्यात आली आहे, तसेच जिल्हा परिषद शाळेस पालकमंत्री निधीमधून डिजिटल शाळेसाठी 2.50 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
गावातील जिल्हा परिषद शाळेस संरक्षण भिंतीचे काम प्रस्तावित असून, गावामध्ये पावसाळ्यामध्ये वीज पडून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात आली आहे. करोना काळात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना “कोविड योद्धा’ पुरस्कारांने सन्मानित करण्यात आहे. ग्रामदैवतांची यात्रा असो किंवा अखंड हरिनाम सप्ताह असो, गावामधील प्रत्येक उपक्रमात ते नेहमी पुढे असतात. गावामध्ये एकूण 11 महिला बचत गट ऑनलाइन पद्धतीने नोंदणीकृत केले असून, बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बचत गटाच्या माध्यमातून भविष्यात मोठे उद्योग महिलांसाठी निर्माण करण्याचा सरपंच अमर बुदगुडे यांचा मानस आहे.
संकलन : भुजंगराव दाभाडे, भोर तालुका प्रतिनिधी