वडगाव मावळ – बनावट गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर वडगाव मावळ पोलिसांनी धाड टाकून मुद्देमालास मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 5) सायंकाळी 4 वाजता फिडेक्स कंपनी पाठीमागे महेश कुडे यांच्या गोडाऊनच्या समोर, वडगाव मावळ येथे केली. आरोपीला वडगाव मावळ न्यायालयाने गुरुवारपर्यंत (दि.9) पोलीस कोठडी दिली.
बनावट गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, यंत्र, साधनसामग्री व कार असा एकूण 11 लाख, 98 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. श्रीकांत बाळू चांदेकर (वय 32, रा. ढोरे वाडा, वडगाव मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्रात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती, साठवण, विक्री व वाहतूक करण्यासाठी बंदी आहे. वडगाव मावळ हद्दीत बनावट गुटखा बनवणाऱ्या कारखाना सुरू करून बनावट गुटखा बनवून वितरण करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याने घटनास्थळी पोलीस उप निरीक्षक विजय वडोदे, पोलीस हवालदार श्रीशल्य कंटोळी, मनोज कदम, कैलास कदम आदींनी हजर राहून पाहणी केली असता, बनावट गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, यंत्र साधनसामग्री चार चाकी तसेच आरोपी श्रीकांत चांदेकर रंगेहात सापडला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सोमवारी (दि. 6) दुपारी 2 वाजता वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी न्यायाधीशांनी आरोपी चांदेकर याला गुरुवारपर्यंत (दि.9) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.