पुणे : भिवंडीमध्ये शाळेतील मुलाचे अपहरण करुन खून करणाऱ्या गुन्हेगाराला बंडगार्डन पोलिसांनी ताडीवाला रस्त्यावरुन अटक केली. भिवंडतील खूनाचे सीसीयीव्ही फुटेज बंडगार्डन पोलिसांना प्राप्त झाल्यावर त्यांनी ही कारवाई केली. दरम्यान भिवंडी पोलिसही आरोपीच्या मागावर होते. या खून प्रकरणानंतर भिवंडी पोलीस ठाण्यासमोर स्थानिक नागरिकांनी मोठे आंदोलनही केले होते.
रामनाथ उर्फ पापा मेमीनाथ सोनावणे ( २२ रा.१३ ताडीवाला रोड, पुणे ) असे अटक आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रामनाथ आणि भिवंडीतील करण लष्कर यांची येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना मैत्री झाली होती, रामनाथ हा एका मोक्काच्या गुन्हयामध्ये शिक्षा भोगत होता. दरम्यान दोघेही जामिनावर सुटले . करण लष्कर याने भिवंडी येथे रामनाथ यास १३ फेब्रुवारी रोजी रहाण्यास बोलवले होते. दरम्यान करणच्या मामाच्या मुलाची शाळेत भांडणे झाली होती, त्याला वर्गातील एका मुलाने बेदम मारले होते. याचा बदला घेण्याचे करणने ठरवले.
तो रामनाथ आणि इतर साथीदारांना घेऊन शाळेमध्ये गेला. तेथून मारहाण केलेल्या मुलाला उचलून दुचाकीवर टाकले. यानंतर भिवंडी येथील साठेनगर परिसरात आणून बेदम मारहाण करण्यात आली. संबंधीत मुलाचा उपचारा दरम्यान दोन दिवसांत मृत्यू झाला. यानंतर पालकांनी आणि रहिवाशांनी भिवंडी पोलीस ठाण्यासमोर मोठे आंदोलन केले. त्यानंतर भिवंडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व नागरिकांनी काढलेले व्हिडिओ पाहून तपासात करण हनुमंत लष्कर ( २१ , रा. साठेनगर नारपोली, भिवंडी, दिनेश मारुती मोरे ( १८ ), चंदन उपेद्र प्रसाद गौड ( २८ ) कैलास खंडु धोत्रे ( ४१ ), आकाश परशुराम जाधव ( २३), विशाल विठ्ठल साबळे ( २२ , सर्व रा. भिवंडी) यांना अटक केली तर रामनाथ सोनवणेचा शोध सुूरु होता.
यामध्ये रामनाथ हा गाडी चालवताना दिसत होता. मात्र अटक आरोपींनी त्याची कोणतीच माहिती भिवंडी पोलिसांनी दिली नाही. यामुळे रामनाथचा माग काढणे भिवंडी पोलिसांना शक्य झाले नाही. मात्र हा मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडिओत बंडगार्डन पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार ज्ञाना बडे आणि मनोज भोकरे यांच्या पहाण्यात आला.
गाडी चालवणारा आरोपी हा आपल्या पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार रामनाथ सोनवणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अधिक माहिती काढली असता, आरोपी रामनाथ हा ताडीवाला रोड येथे घराजवळ असल्याची खबर मिळाली. यानंतर त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी करता, त्याने खूनाची कबुली दिली. त्याला भिवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपआयुक्त स्मार्तना पाटील , सहायक आयुक्त सुर्वे , वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पोलिस अंमलदार सुधीर घोटकुले, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक यांचे पथकाने केली.