पिंपरी – खुनातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर आरोपींनी गोळीबार केला. ही घटना रविवारी (दि. 26) रात्री चाकण जवळील जंगलात घडली. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. या घटनेच्या वेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आरोपींवर झाड फेकले आणि आरोपी खाली पडले.
गणेश हनुमंत मोटे (वय 23, रा. सांगवी, मूळ रा. वैराग, ता. मोहोळ जि. सोलापूर), महेश तुकाराम माने (वय 23, रा. कवडेनगर, सांगवी, मूळ रा. पाठसांगवी, ता. भूम, जि. उस्मानाबाद), अश्विन आनंदराव यादव (वय 21, रा. काटेपुरम चौक, विनायकनगर, नवी सागंवी, मूळ रा. श्रीपत पिंपरी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांना अटक केली आहे. योगेश रवींद्र जगताप (रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी काटेपूरम चौकात गोळीबार करून योगेश जगतापचा खून झाला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
योगेश जगताप खून प्रकरणातील तिघेजण चाकण जवळील कुरकुंडी येथे फिरत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चार पथके तयार करून आरोपींचा शोध घेतला. एका घरात आरोपी लपून बसले होते. पोलीस आरोपींच्या दिशेने जात असताना आरोपी पळून जात होते. दोघांनी पोलिसांच्या दिशेने दोन राउंड फायर केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांनी आरोपींच्या दिशेने फायरिंग केले. आरोपी झुडपातून पळून जात असताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तिथे पडलेले झाड उचलून आरोपींच्या अगांवर टाकले. त्यामुळे आरोपी खाली पडले व पोलिसांनी आरोपींना पकडले.
या कामगिरीमध्ये पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर, वरीष्ठ निरीक्षक सुनिल टोणपे, सहाय्यक निरीक्षक सतीश कांबळे, हरीश माने आदींनी सहभाग घेतला.
=======================