कुडजे : एनडीए रोडवरील कमळादेवी मंदिरासमोर शनिवारी दुपारी बारा वाजता एका माकडाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात माकडाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हेमराज पायगुडे आणि प्रवीण सोनावणे यांनी घटनास्थळी जाऊन माकडाला पाणी पाजले परंतू डोक्याला मार लागल्याने माकडाने काही क्षणात प्राण सोडले.
दरम्यान, गावचे पोलीस पाटील दत्ता पायगुडे यांनी घटनेची माहिती भांबुर्डा वनआधिकारी सचिन सपकाळ यांना दिली त्यानंतर त्यांनी ताबडतोब येऊन मृत माकडाला घेउन गेले. पोलीस पाटील म्हणाले की आमच्या भागात पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. हौशी पर्यटक रस्त्याने येता-जाता माकडांना खाऊ टाकतात आणि फोटो काढतात. त्यावेळी माकडे खाण्याच्या आशेने रस्त्याने आडवी पळतात. त्यामुळे वाहनचालकांचा सुद्धा अपघात होण्याची शक्यता आहे.
पोलीस पाटील दत्ता पायगुडे म्हणाले, “निसर्गाने सर्व प्राण्यांची खाण्याची व्यवस्था केलेली असते त्यामुळे लोकांनी माकडांना खाऊ देण्याची आवश्यकता नाही. खाण्याच्या आशेने ते रस्त्यावर वाट पाहत बसतात आणि त्यांना असे प्राणाला मुकावे लागते.” लवकरच वनविभागाशी पत्रव्यवहार करून यापुढे असे अपघात होऊन प्राण्यांचे जीव जाणार नाहीत याची काळजी घेतली जाईल.