नवी दिल्ली – पाकिस्तानातून प्रियकरासाठी भारतात आलेल्या महिलेबाबत पाक गुप्तचरांनी खुलासा केला आहे. “ती केवळ प्रेमापोटी भारतात आली आहे.’ असे पाक गुप्तचरांनी म्हटले आहे. सीमा गुलाम हैदर ही चार मुलांची आई असलेली महिला सिंध प्रांतातील कराचीमधून भारतातल्या सचिन मीना या युवकाला भेटण्यासाठी भारतात आली आहे.
2019 मध्ये “पब्जी’ खेळत असताना या दोघांचा परिचय झाला होता. त्याच्याबरोबर राहण्यासाठी सीमा 1,300 किमोमीटरचा प्रवास करून भारतात आली आहे. 30 वर्षांची सीमा आणि 22 वर्षांचा सचिन सध्या नवी दिल्लीजवळील ग्रेटर नोएडात राबुपोरा भागामध्ये रहात आहेत.
सचिन या भागामध्ये एक प्रोव्हिजन स्टोअर चालवतो आहे, असे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे. सचिनशी केवळ लग्न करण्यासाठी सीमा हैदर भारतात गेली आहे. त्यांच्या रिलेशनशिपमध्ये केवळ ‘प्रेम’ आहे. देश सोडून जाण्यामागे अन्य कोणताही हेतू नाही, असे पाकिस्तानमधील गुप्तचरांनी स्थानिक प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे. पाक गुप्तचरांचा हा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे.
पाकिस्तानात परतल्यास शिक्षेची धमकी…
सीमा जर भारतातून पाकिस्तानला परतली तर तिला शिक्षा केली जाईल, अशा स्पष्ट शब्दात मिलान मिथ्थू या पाकिस्तानमधील धार्मिक नेत्याने सीमाला धमकावले आहे. सीमाच्या मूळ गावातील हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर हल्ल्याची धमकीही मिथ्थू यांनी दिली आहे. रविवारी सिंधमधील राधास्वामी दरबार मंदिरावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. जेकबाबाद जनरल हिंदू पंचायतचे अध्यक्ष लालचंद सीतलानी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. सीमाने मात्र पाकिस्तानमध्ये परत जाण्याची आपली ईच्छा नसल्याचे स्पष्ट केले असून आपल्याला भारतातच राहू द्यावे, अशी विनंती सरकारकडे केली आहे. भारतात राहण्यासाठी आपण हिंदू धर्म स्विकारायलाही तयार असल्याचे तिने म्हटले आहे.