सासवड-येथे संत सोपानकाका महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. 22) दुपारी 4 वाजता टाळ – मृदुंगाच्या गजरात, भगव्या पताकांच्या गर्दीत, हजारो वैष्णवांच्या उपस्थितीत संत सोपानकाका महाराजांच्या पादुकांची पालखीतून नगरप्रदक्षिणा करण्यात आली.
सायंकाळी 5 ते 6 ह.भ.प. झेंडे महाराज यांचे प्रवचन, सायंकाळी 6 नंतर सोहळ्यासाठी आलेल्या दिंड्यांच्या प्रमुखांचा सत्कार सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. रात्री 9 ते 11 ह भ प लक्ष्मणबुवा एदलाबादकर यांचे कीर्तन होऊन रांजणी, खामगाव, आंबेड, कोंडगाव ग्रामस्थ, सासवडकर व गणपतबुवा जाधव यांच्या दिंडीचा जागर झाला.
एकादशीनिमित्त मंदिरात दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त मंदिरात आठवडाभर हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, भजन आदी विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. मंगळवारी (दि. 24) सकाळी 9 वाजता संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. केशव महाराज नामदास यांचे संत सोपानकाका महाराजांच्या समाधी वर्णनाचे कीर्तन होणार आहे. याचदिवशी सकाळी 11 ते दु 1 वा ह.भ.प. कोकाटे महाराजांचे काल्याचे कीर्तन होऊन नंतर दहीहंडी व दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. बुधवारी (दि. 25) उत्सवाचा शेवटचा दिवस असून या दिवशी पहाटे प्रक्षाळ पूजा होणार आहे तसेच भाविकांना सोपानकाकांच्या समाधीस गरम पाण्याने स्नान घालता येणार असल्याची माहिती सोपानदेव ट्रस्टचे मुख्य विश्वस्त गोपाळ गोसावी यांनी दिली.