नवी दिल्ली – चीनमधील जन्मदर सातत्याने घटत असल्याचे सिध्द होत असल्यामुळे तेथील सरकार काहीसे चिंतित आहे. त्यामुळेच युवकांनी आणि युवतींनी लग्न करावे आणि मुले जन्माला घालावी याकरता त्यांना प्रोत्साहित करण्याची एक वेगळीच योजना तेथील सरकारने सुरू आहे. अशा जोडप्यांना तेथील सरकार 1 हजार युआन अर्थात 11 हजार 321 रूपये रक्कम बक्षिस देते आहे. चीनच्या पूर्व भागातील प्रदेशात ही योजना लागू झाली असून अट केवळ एकच आहे की लग्न करणाऱ्या युवतीचे वय 25 पेक्षा कमी असावे.
वृत्तसंस्थेने याबाबत दिलेल्या बातमीनुसार योग्य वयात लग्ने व्हावीत आणि योग्य वयातच मुलांना जन्म दिला जावा यादृष्टीने प्रोत्साहन देणे हा या बक्षिसामागचा हेतू आहे. केवळ एवढेच नाही तर या जोडप्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांचे योग्य संगोपन व्हावे यासाठीही प्रशासन अनुदान देणार आहे.
चीनमधील कायद्यानुसार विवाहाच्या वेळी मुलाचे वय किमान 22 तर मुलीचे वय किमान 20 वर्षे असले पाहिजे अशी अट आहे. मात्र गेल्या काही वर्षांत चीनमध्ये लग्नाची गाठ बांधणाऱ्या जोडप्यांची संख्याच कमी कमी होत चालली असून त्याचा परिणाम जन्म दरावरही झाला आहे.
गेल्या 8 वर्षांत पहिल्यांदाच चीनमध्ये लोकसंख्येत घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे सरकारच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळेच हा जन्मदर वाढवण्यासाठी विविध योजनांची आखणी केली जाते आहे आणि विविध सुविधा पुरवण्याचे आश्वासनही दिले जाते आहे. केवळ गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीचा विचार केला तर 2022 मध्ये चीनमध्ये 2021 च्या तुलनेत विवाहांची संख्या तब्बल 8 लाखांनी घटली आहे.