धनकवडी, दि. 31 (धिरेंद्र गायकवाड) – कात्रज, धनकवडी, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ परिसर, बालाजीनगर या परिसरात आज सकाळपासूनच घरगुती गणेश भक्त आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जल्लोषात ढोल-ताशा पथकाच्या निनादात भक्तिमय वातावरणामध्ये गणरायाचे आगमन झाले. सर्वच मंडळांकडून धनकवडी परिसरातील गणेशोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. शक्ती आणि बुद्धीची देवता असणाऱ्या श्री गणेशाचे आज बुधवारी स्वागत करण्यासाठी उत्साही धनकवडीकर सज्ज झाले होते. गेली दोन वर्षे करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. मिरवणुका, देखावे आणि भाविकांच्या दर्शनावरील मर्यादा घालण्यात आल्या होत्या. आता, करोनाचे संकट आटोक्यात आल्याने यंदा गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होत आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह होता. वाजत, गाजत सर्वांचे लाडके बाप्पा आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये विराजमान झाले.
धनकवडीतील गुलाबनगर आणि मोहननगर येथील नऊ गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणेश प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी एकत्रित मिरवणूक काढण्याचा निर्णय घेत एकात्मतेच्या संदेशाबरोबरच करोनाकाळात बिघडलेल्या आर्थिक आणि सामाजिक घडीमुळे मंडळांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलले.
स्वातंत्र्यपूर्व काळात संघटन आणि घरातील गणरायाला सार्वजनिक उत्सवाचे रूप देण्यात आले. यातून गणेशोत्सवाची चळवळ बहरत गेली. या चळवळीत आतापर्यंत “एक गाव, एक गणपती’ यासारखे अनेक प्रयोग राबवले गेले. याच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चळवळीत आता आणखी एक नवीन उपक्रम यशस्वी करण्यात आला.
स्वारगेट-सातारा रस्त्यावरील धनकवडी, गुलाबनगर भागातील नऊ गणेशोत्सव मंडळांनी एकात्मतेचा संदेश देण्यासाठी गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी एकत्रित मिरवणूक काढली. यामध्ये केशव मित्र मंडळ, पंचरत्नेश्वर मित्र मंडळ, नरवीर तानाजीनगर मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, फाइव्ह स्टार मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ आणि अखिल मोहननगर मित्र मंडळ सहभागी झाले होते.
गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुकीमध्ये विविध ढोल-ताशा पथकांचे वादन झाले. ज्ञान प्रबोधनी ढोल-ताशा पथक किंवा ध्येय ढोल-ताशा पथक गोविंदा बॅंड-पथक अशी पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. यावेळी या नऊ गणेश मंडळाचे अध्यक्ष व गणेशभक्त व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मिरवणूक दुपारी तीन वाजता गुलाबनगर चौकातून सुरू होऊन मोहननगर येथे सायंकाळी सहापर्यंत पोहोचली होती.
डीजे ऐवजी ढोल…
श्रीगणेशाची मिरवणूक काढताना आज कोठेही डीजेच्या भिंती दिसल्या नाहीत. याऐवजी ढोल-ताशांच्या पथकांचा आवाज घुमत होता. काही ठिकाणी लेझीम, तलवारबाजी असे पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. मिरवणुकीची असे चित्र दिसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांनी मंडळांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
===================