मुंबई : यंदाच्या महानगरपालिका निवडणुकांना गालबोट लागल्याचं चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांवर हल्ल्यांच्या घटना घडत असून, मुंबईतही गंभीर प्रकार समोर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील वांद्रे परिसरातील ज्ञानेश्वर नगर येथे प्रचारासाठी गेले असताना अज्ञात हल्लेखोराने हाजी सलीम कुरेशी यांच्या पोटात चाकू खुपसला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या महात्मा गांधी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच या हल्ल्यामागील कारणही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यातील विविध भागांत उमेदवारांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी उमेदवारांवर दबाव टाकण्यासाठी आणि दहशतीचं राजकारण करण्यासाठी अशा प्रकारांचा वापर केला जात असल्याचे आरोप होत आहेत. यासंदर्भातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, या घटनांमुळे सध्याच्या राजकारणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हाजी सलीम कुरेशी हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. यापूर्वी ते एमआयएम पक्षात कार्यरत होते. मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उमेदवारी दिली होती.