मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी तारखांची घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकांसोबतच मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुकांचीही घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आयोगाने तसे न केल्याने सर्वांचे लक्ष महापालिका निवडणुकांकडे लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 31 जानेवारी 2025 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेणे बंधनकारक असल्याने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीत ५० पेक्षा जास्त जागा लढवण्याची मोठी घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. एमआयएमची ठोस तयारी आणि रणनीती एमआयएमचे मुंबई अध्यक्ष हाजी फारुख मक्बुल शाब्दी यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पक्षाच्या योजना स्पष्ट केल्या. “आम्ही मुंबई महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. कमीत कमी ५० जागांवर आमचे उमेदवार उभे असतील,” असे शाब्दी यांनी सांगितले. नुकतेच महापालिकेच्या प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) साठी काही प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. यामुळे पक्षाच्या अनेक इच्छुक कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. तरीही पक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. “गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांची निराशा झाली तरी आम्ही माघार घेणार नाही. कमीत कमी ५० जागांवर लढण्याची पूर्ण तयारी आहे,” असे शाब्दी यांनी नमूद केले. पक्षांतर्गत प्राधान्य: आयारामांना नंतर संधी पक्षाच्या उमेदवारी वाटपाबाबत शाब्दी यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाच प्राधान्य दिले जाईल. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात दाखल झालेल्या आयाराम-गयारामांचा विचार नंतर केला जाईल,” असे त्यांनी सांगितले. यामुळे पक्षांतर्गत शिस्त आणि निष्ठा यांना महत्त्व दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाची ‘बी टीम’ आरोप आणि महाविकास आघाडीला फटका एमआयएमवर नेहमीच भाजपाची ‘बी टीम’ असल्याचा आरोप होतो. मुंबई महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या प्रवेशामुळे अप्रत्यक्ष फायदा भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला होऊ शकतो, असा दावा विरोधक करतात. याबाबत विचारले असता शाब्दी यांनी हे आरोप फेटाळून लावले. “भाजपाची बी टीम असल्याचा आरोप नवा नाही. आम्ही स्वतःच्या ताकदीवर आणि मुस्लिम समाजाच्या हितासाठी निवडणूक लढवतो आहोत. आमचा कोणत्याही पक्षाशी साटालोटा नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. एमआयएमच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला (कॉंग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गट शिवसेना) मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मुस्लिमबहुल भागांत एमआयएमची मतपेढी मजबूत असल्याने आघाडीच्या उमेदवारांच्या मतविभागणीची शक्यता वाढते. आता महाविकास आघाडी हा फटका कसा भरून काढणार आणि मुस्लिम मतदारांना कसे एकसंघ ठेवणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.