Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं
आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या सुमारे ४ ते ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

Mumbai film city – मुंबईच्या गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीत अचानक लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली आहे. फिल्म सिटी परिसरातील ‘प्राइम फोकस स्टुडिओ’च्या एका भागात सोमवारी अचानक आगीचा भडका उडाला. काही क्षणांतच आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट परिसरात पसरल्याने शूटिंग सेटवर एकच धावपळ उडाली.
विशेष म्हणजे, ज्या परिसरात आग लागली त्याच्या अगदी जवळ ‘MTV Hustle’च्या ग्रँड फिनालेचं शूटिंग सुरू होतं. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शूटिंग तातडीने थांबवण्यात आलं आणि सेटवरील कलाकारांसह क्रू मेंबर्सना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘MTV Hustle’च्या ग्रँड फिनालेसाठी रॅपर बादशाह सेटवर उपस्थित होते. त्यांच्यासोबत रफ्तार, इक्का, डिनो जेम्स, डी एमसी, ईपीआर आणि रागा यांच्यासह शोचे स्क्वॉड बॉसेस, ज्यूरी आणि फायनलिस्ट्सही शूटिंगसाठी दाखल झाले होते. मात्र, अचानक आगीची घटना घडल्याने सेटवरील वातावरण काही काळातच बदललं.
एमएस धोनीही जवळच शूटिंग करत असल्याची माहिती
या घटनेमुळे आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. ‘MTV Hustle’च्या सेटच्या शेजारी ‘पती पत्नी और पंगा’ या शोचा सेट असल्याची माहिती आहे. याशिवाय काही अंतरावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे.
आगीचा धूर आणि संभाव्य धोका लक्षात घेता आसपासच्या सेटवरील शूटिंगही खबरदारी म्हणून थांबवण्यात आलं. परिसरातील कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.
आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या सुमारे ४ ते ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. स्टुडिओतील सुरक्षा कर्मचारी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनीही बचावकार्य आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत केल्याची माहिती आहे.
आगीचं नेमकं कारण काय?
दरम्यान, या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेची पाहणी केल्यानंतर आगीचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.






