Sanjay Shirsat : झकमारी केली अन् मंत्री झालो; ‘या’ नेत्याच्या विधानाने उडाली खळबळ
छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीच्या प्रचारसभेत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलेल्या एका खळबळजनक विधानाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगवली आहे.

Sanjay Shirsat : छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीच्या प्रचारसभेत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलेल्या एका खळबळजनक विधानाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगवली आहे. “आम्ही २०२२ मध्ये झकमारी केली म्हणूनच मी आज मंत्री झालो, त्यातही मंत्रिपदासाठी प्रचंड स्पर्धा होती,” अशा थेट शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील बंडाच्या आठवणींना उजाळा दिला.
मी आज राजकारणात जे काही मिळवले आहे, ती केवळ आणि केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई आहे, अशी भावनाही त्यांनी (Sanjay Shirsat) यावेळी व्यक्त केली. आपल्याच निवडणूक अनुभवांचे दाखले देताना शिरसाट यांनी निवडणूक लढवणे हे किती जिकिरीचे काम असते, याचे वास्तव मांडले.
माझा मतदारसंघ अवघ्या २० किलोमीटरच्या परिघात असून ४ लाख मतदार आहेत, तरीही मी ३० टक्के भागांत पोहोचू शकत नाही. कार्यकर्त्यांची समजूत काढण्यातच अर्धा वेळ खर्ची पडतो, मग प्रत्यक्ष प्रचार कसा करायचा असा प्रश्न पडतो.
सतीश चव्हाण या निवडणुकीचा डोलारा कसा सांभाळणार हे त्यांचे त्यांनाच ठाऊक, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. पहिल्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा आपल्याला विजयाची खात्री नव्हती, तरीही जनतेने चौथ्यांदा निवडून दिले, हे सांगताना सभेत चांगलाच हशा पिकला.
सभेतील आपल्या भाषणादरम्यान शिरसाट यांनी एका अंतर्गत राजकीय समीकरणाचाही गौप्यस्फोट केला. महायुतीकडून उमेदवारी काल जाहीर झाली असे लोकांना वाटत असले, तरी सतीश चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वीच अर्ज भरण्याची तयारी करून ठेवली होती आणि ही गोष्ट फक्त आम्हा दोघांनाच माहीत होती, असा खुलासा त्यांनी केला.
७६ तालुके, १८ दिवसांचा कालावधी, मध्ये येणारा दसरा आणि दुष्काळाचे सावट यामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढणे म्हणजे दिव्यच आहे; मी कधी पदवीधर झालो तरी ही निवडणूक कधी लढणार नाही, असेही ते म्हणाले.
शेवटी सतीश चव्हाण यांना विजयाचा कानमंत्र देताना त्यांनी सांगितले की, उगाच आव आणू नका, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना आनंदी ठेवा. कार्यकर्त्यांच्या ताकदीवरच निवडणुका जिंकल्या जातात. काही कमी पडले तर पाठीशी उभा राहण्यासाठी मी (Sanjay Shirsat) आहेच, अशी ग्वाही देतानाच विक्रम काळेंच्या विजयात त्यांच्या वडिलांची पुण्याई होती, तर माझ्या विजयामागे शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आहेत, असे शिरसाट यांनी नमूद केले.






