पुणे – गेल्या दहा दिवसांपासून शहरात करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा लक्षणीय वाढत असला, तरी त्यांच्यात सौम्य लक्षणे असलेल्यांचे प्रमाण सुमारे 95 टक्के आहे. त्यामुळे बहुतांश जण घरीच विलगीकरणात आहेत, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्ष, तसेच नव्या बाधितांसाठी बेड्स वाढवले जात आहेत.
शहरात 9 फेब्रुवारीपासून करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा अचानक वाढण्यास सुरुवात झाली आहे. 20 फेब्रुवारीअखेर नवीन 3,774 बाधित सापडले असून, यामध्ये गंभीर रुग्णांची संख्या 40 ने वाढली असून, ऑक्सिजनची गरज भासलेल्यांची संख्या 117 आहे. त्यामुळे नव्या रुग्णांच्या तुलनेत तातडीच्या हॉस्पिटलची गरज भासलेल्यांचा आकडा अवघा 4 टक्के आहे.
तर उर्वरित जवळपास सर्वच रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना औषधे देऊन घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 20 फेब्रुवारीअखेर सक्रीय बाधितांपैकी सुमारे 1,800 रुग्ण घरीच तर, 700 जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
मंचरमध्ये मंगल कार्यालयावर कारवाई
मंचर येथील मंगल कार्यालयामध्ये गर्दी तसेच डीजे सुरू असल्याप्रकरणी पाच जणांविरोधात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल केला आहे. पिंपळगाव रस्त्यालगत रामदास खानदेशे यांच्या मुलाच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमानिमित्त डीजे सिस्टीमच्या मोठ्या आवाजात अंदाजे दीडशे ते दोनशे लोक सहभागी झाले होते.