कान्हे, (वार्ताहर) – आंदर मावळ भागाचे प्रवेशद्वार असलेल्या कान्हे येथे मुंबई–पुणे महामार्गालगत ग्रामपंचायतच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच तलावाचे सुशोभीकरण व आंबेवाडीमधील बहुउद्देशीय सभागृह या कामांचे भूमीपूजन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष किशोर सातकर, ग्रामीण अध्यक्ष संदीप आंद्रे, प्रकाश आगळमे, सरपंच विजय सातकर, उपसरपंच सुजाता चोपडे, गिरीश सातकर, महेश सातकर, किशोर सातकर, बाबाजी चोपडे, सोपान धिंदळे, संदीप ओव्हाळ, आरिफ मुलानी, अश्विनी शिंदे, आशा सातकर, रूपाली कुटे, मनीषा ओव्हाळ, सोनाली सातकर, रोहिणी चोपडे, पूजा चोपडे, ग्रामविकास अधिकारी संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फूट उंचीच्या अश्वरूढ पुतळ्याचे शिवस्मारक तसेच तलावाच्या २० गुंठे जागेमध्ये सुशोभीकरण असे मावळ तालुक्यातील मावळ्यांना प्रेरणादायी ठरणाऱ्या शिवस्मारक संपूर्ण मावळ तालुक्यात प्रथमच कान्हे गावामध्ये सुरू होत आहे.
त्याचबरोबर कान्हे ग्रामस्थांच्या मागणीनुसार भविष्यकाळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी असे सभागृह, व्यायामशाळा, महिला योगा सेंटर व सार्वत्रिक कार्यक्रमांच्या उद्देशाने ३५० ते ४०० लोक बसतील अशा प्रशस्त हॉलचे महिलांना प्रशिक्षणासाठी, इतर सर्व प्रकारचे ट्रेनिंगसाठी, विवाह सोहळा व वाढदिवसाच्या सार्वजनिक वापरासाठी एक अद्यावत सभागृह आंबेवाडी येथे उभारण्यात येणार आहे.
सभागृहासाठी दिली ३ एकर जागा आंबेवाडी येथील सिद्धिविनायक सोसायटीमधील अंबादास पाचपोर यांनी ३ एकर जागा ग्रामपंचायतीस बक्षीसपत्र करून, ७/१२ ग्रामपंचायतीच्या नावे करून दिला आहे. यासाठी सरपंच विजय सातकर, ग्रामपंचायत सदस्य किशोर सातकर व भाऊ शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले आहे. जागा दिल्याबद्दल सरपंच विजय सातकर व ग्रामपंचायतच्या वतीने अंबादास पाचपोर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.