लाहोर- पाकिस्तानात सूडाचे राजकारण काही नवे नाही. एखादा नेता राजकारणात सत्तेवरून पायउतार झाल्यावर अथवा पदच्यूत केल्यावर त्या देशात त्या नेत्याची अथवा त्याची निकटवर्तीयांची रवानगी थेट तुरूंगात तरी होते किंवा त्याची हत्या तरी होते. जिवंत राहायचे असेल तर त्याला देशाबाहेरच जावे लागते.
माजी पंतप्रधान नवाज शरीफ सध्या उपचारासाठी परदेशात आहेत. मात्र त्यांचे जावई व कन्या पाकिस्तानातच आहेत. जावई सफदर अवान यांना आता अटक करण्यात आली आहे. स्वत: मरियम नवाज यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
कराचीत ज्या हॉटेलात आम्ही थांबलो होतो तेथे पोलीस आले. त्यांनी हॉटेलचा दरवाजा तोडला आणि सफदर यांना घेउन गेले असे मरियम यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मरियम यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त रॅलीत पाकिस्तान सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही कृती करण्यात आली आहे. इम्रान सरकार आपले अपयश झाकण्यासाठी लष्कराला पुढे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
इम्रान खान घाबरट आहेत. त्यांना काही प्रश्न विचारल्यावर ते घाबरून लष्कराच्या मागे लपतात. आपले अपयश झाकण्यासाठी लष्कराला ते पुढे करतात. असे करून ते लष्कराचीच प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप मरियम यांनी केला.