शिक्रापूर : महिला व मुलींवरील अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत असताना पाबळ (ता. शिरूर) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची निंदनीय घटना घडली. त्या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली आहे.
पाबळ येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच घडलेली असताना आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे देखील भेट दिली. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महिलाप्रदेश उपाध्यक्षा ज्योती जाधव, सरचिटणीस अॅड. वर्षा डहाळे, भारतीय जनता पार्टीचे शिरूर आंबेगाव अध्यक्ष सतीश पाचंगे, शिरूर तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र भुजबळ, भाजपाचे नेते जयेश शिंदे, शिरूर तालुका उपाध्यक्ष राजेंद्र मांढरे, नवनाथ सासवडे, माऊली साकोरे, संदीप साकोरे यांसह आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सदर घटनेबाबत सखोल तपास लावण्याची मागणी खापरे यांनी शिक्रापूर पोलिसांकडे केली. पुढे बोलताना दिवसेंदिवस महिला व मुलींवरील अत्याचार वाढत असून सरकारचे याकडे लक्ष नसल्याचे सांगत सरकारने महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या बदलण्यासाठी राजकारण केले असून त्या जागेवर अद्याप महिला नेमलेली नसून महिला आयोगावर महिला अध्यक्षा नेमण्याची मागणी देखील सरकारकडे केली. तसेच महिलांना सुरक्षित ठेण्याचे काम सरकारने करावे अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याची वेळ मुख्यमंत्र्यांनी आणू नये असे देखील यावेळी उमा खापरे यांनी सांगितले आहे.
सध्याचे सरकार म्हणजे तीन तिघाडी काम बिघाडी सरकार
सध्या महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार असल्याने महाराष्ट्रातील घटना दररोज वाढत आहेत. मात्र सरकारचे याकडे लक्ष नसून सध्याचे सरकार म्हणजे तीन तिघाडी काम बिघाडी सरकार असल्याचा टोला देखील यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी सरकारला लगावला आहे.