नगर – नगर शहराच्या विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा करुन, मोठा निधी उपलब्ध करून घेतला जात आहे. त्यामुळे विकास कामांमध्ये नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा असते. यासाठी नगरकरांनी विकास कामांमध्ये सामील होऊन शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी मदत करावी, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
फलटण पोलीस चौकी ते सर्जेपुरा पेट्रोलपंप, एसटी वर्कशॉप, रामवाडी ते तारकपूर रस्त्याची पाहणी आ. संग्राम जगताप यांनी केली. यावेळी मनपा स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख, माजी स्थायी समिती सभापती सचिन जाधव, माजी नगरसेवक आरिफ शेख, उबेद शेख, माणिक विधाते, निखिल वारे, सुमित कुलकर्णी, अभिजित खोसे, बाळासाहेब जगताप, जनक आहुजा, अतिक्रमण विभागप्रमुख कल्याण बल्लाळ आदी उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले की, मागील महिन्यात या दुकानदारांशी चर्चा करुन, अतिक्रमण काढण्याची विनंती केल्यानंतर सर्व व्यवसायिकांनी पुढे येऊन अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य केले. या सहकर्यामुळे त्यांचे आभार मानतो. एसटी वर्कशॉप, रामवाडी ते तारकपूरपर्यंत नव्याने विकसीत होणारा रस्ता असल्यामुळे या भागातील नागरिकांना जवळचा मार्ग निर्माण होणार आहे. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. डीपी रस्त्यामुळे शहराच्या वैभवात भर घालण्याचे काम होत आहे. तसेच यावेळी अतिक्रमण काढताना शाहीर शेख, सलीम शेख, समीर बागवान, अमोल डागा यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे ते म्हणाले.