शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक
पुणे – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी घेत गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, मितेश घट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.
देशमुख यांनी करोना आणि त्यानिमित्त निर्माण झालेली परिस्थिती जाणून घेतली. पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी पुणे शहर पोलिसांनी हद्दपार आरोपींसाठी तयार केलेल्या “एुढीर” (ढीरलज्ञळपस ेष एुींशीपशशी) ऍपची माहिती दिली. पुणे शहरामधून हद्दपार झालेल्या व्यक्तीस त्याने पुन्हा पुणे शहरात येऊन गुन्हेगारी कृत्य करू नये, यासाठी हे ऍप विकसित करण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीची सुरवात करण्यात आली आहे. या ऍपमुळे हद्दपार गुन्हेगारास गुन्हेगारी कृत्य करण्यापासून परावृत्त करण्याचा मुख्य उद्देश साध्य होईल. हद्दपार आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे सोयीचे होईल.
हद्दपार गुन्हेगारावर निगराणी-देखरेख करणे सोयीस्कर होईल. कमी मनुष्यबळामध्ये परिणामकारकरित्या गुन्हेगारावर निगराणी ठेवणे शक्य होईल. हद्दपार आदेशाचे उल्लघंन होवून दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होऊन पोलीस तपास यंत्रणेवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हेगार हद्दपार कालावधीमध्ये वास्तव्यास असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये देखील नमुद गुन्हेगारावर प्रभावी निगराणी ठेवू शकतील, असे बच्चन सिंग यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी “स्मार्ट पोलिसिंग” बाबत माहिती दिली. बैठकीस इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
ऍपद्वारे 20 जणांवर निगराणी
या ऍपच्या माध्यमातून आजपर्यंत 20 तडीपार आरोपींवर निगराणी ठेवण्यात आली आहे. तसेच यातील एका आरोपीला तडीपारीचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्यात आले आहे. कोर्टाने त्यास 4 महिने कैद आणि 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.