करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली 126 वर
शिरवळ (प्रतिनिधी) – खंडाळा तालुक्यात करोनाबाधितांची एकूण संख्या 126 झाली असून त्यातील 70 रुग्ण एकट्या शिरवळमध्ये आहेत. त्यामुळे शिरवळ हे करोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. शिरवळमध्ये आणखी 17 रुग्ण सापडल्याचे रविवारी सकाळी समजल्यानंतर घबराट उडाली आहे.
तालुक्यात आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांची 53 असून सद्य स्थितीत 68 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहेत. यापुढे शिरवळकरांनी अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे असून 50 वर्षांपुढील नागरिकांनी गदींच्या ठिकाणी जाऊ नये. मास्क व सॅनिटायझरचा सतत वापर करावा. घरीच थांबावे, असे आवाहन खंडाळा तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाने काल (दि. 11) रात्री जाहीर केलेल्या अहवालानुसार शिरवळ येथे 22, 54, 65, 28, 71 वर्षे वयाच्या महिला, 82, 34, 27, 25, 20 वर्षे वयाचे पुरुष, कोलाटे आळीत 18 वर्षांचा युवक, भगवा चौक परिसरात 50 वर्षांचा पुरुष, अंबिकामाता परिसरात 62 वर्षांचा वृद्ध, शिर्के कॉलनीत 30 वर्षांची महिला, कबुले आळीत 45, 22 वर्षांच्या महिला व 27 वर्षांचा युवक, यांचा करोनाची बाधा झाली आहे.
आजअखेर खंडाळा तालुक्यातील 20 गावांमध्ये करोना रुग्ण आढळले आहेत. त्यात शिरवळमध्ये 70, खंडाळा, वेळेवाडी, झगलवाडी, मरिआईचीवाडी, अहिरे, पिंपरे बुद्रुक, खेड बुद्रुक व मिरजेवाडी येथे प्रत्येकी एक, अजनुज, पाडळी, कवठे, घाटदरे, येथे प्रत्येकी दोन, पारगाव, शिंदेवाडी येथे प्रत्येकी नऊ, अंदोरी, पळशी येथे प्रत्येकी चार, असवली येथे तीन, धनगरवाडीत पाच बाधित आढळले होते. तालुक्यात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे; परंतु पुणे, मुंबईसारख्या शहरांमधून अनेक नागरिक आपापल्या गावी परत येत असल्याने बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने गणनिहाय भरारी पथके तयार केली असून लोकांवर करडी नजर ठेवली जात आहे. वैद्यकीय यंत्रणा, पोलीस, महसूल विभाग, शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका गावपातळीवर कार्यरत आहेत.