नवी दिल्ली – वीस वर्षांपुर्वी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून राजीव गांधी फौंडेशनला 20 लाखांची देणगी दिल्याचे प्रकरण भारतीय जनता पक्षाकडून उपस्थित करण्यात आल्यानंतर आता कॉंग्रेसही आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीने ट्विटरवर कोणत्या चिनी कंपन्यांकडून पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील पीएमकेअर्स फंडाला निधी देण्यात आला आहे त्याची यादीच प्रसिद्धीला देण्यात आली आहे.
त्यानुसार शिओमी कंपनीकडून 10 कोटी, टिकटॉककडून 30 कोटी, ओप्पोकडून 1 कोटी, हुआवेईकडून 7 कोटी, वनप्लस कंपनीकडून 1 कोटी अशा देणग्या पीएमकेअर्सला देण्यात आल्या आहेत असा दावा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीकडून करण्यात आला आहे. म्हणूनच पंतप्रधानांनी आजच्या आपल्या मन की बातच्या कंटाळवाण्या कार्यक्रमात चीन विरोधात एक शब्दही काढला नाही असा आरोपही महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीकडून करण्यात आला आहे.
चिनी कंपन्यांकडून पीएमकेअर्सला मोठ्या देणग्या मिळाल्या आहेत हेच त्याचे मुख्य कारण आहे असेही त्यांनी म्हटले आहे.