बॉलीवूड अभिनेता आणि प्रसिद्ध कॉमेडियन मोहित बघेलचे वयाच्या 27व्या वर्षी निधन झाले आहे. मोहित बघेल हा तरुण वयातच कर्करोगासारख्या आजाराशी झुंज देत होता. मोहित बघेलने कठोर परिश्रम आणि समर्पणाने मोठ्या आणि छोट्या पडद्यावर आपली ओळख निर्माण केली होती. छोट्या पडद्यावरील कॉमेडी शोमध्ये दमदार अभिनयातून मोहितने बॉलीवूडकडे चांगले यश मिळविले होते. मोहितने सलमान खान आणि असिनबरोबरही काम केले. रेडी चित्रपटात त्याने “छोटी अमर चौधरी’ची भक्कम भूमिका साकारली होती.
यूपीच्या मथुरा या छोट्याशा गावातून मायनागरी मुंबईत धम्माल करणारा हास्य कलाकार मोहित बघेलच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त होत आहे. वयाच्या 27व्या वर्षी आयुष्याची लढाई गमावलेल्या या कलाकाराच्या मृत्यूबद्दल आणि लॉकडाऊनमुळे मोहितला योग्य उपचार मिळू शकले नाहीत, अशीही चर्चा होत आहे. कर्करोगाचा त्रास झालेल्या मोहितवर नोएडाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. पण गेल्या काही दिवसांपासून तो मथुरा येथील आपल्या घरी होता.
मोहित बघेलची आज सकाळी अचानक तब्येत बिघडू लागली. यानंतर कुटुंबीयांनी मोहितला तातडीने नयती रुग्णालयात दाखल केले. पण रुग्णालयाने मोहितला दाखल करण्यास नकार दिला, असा परिवारातील सदस्यांनी आरोप केला आहे. यानंतर मोहितची प्रकृती जास्तच खालावली. जर योग्य वेळी रुग्णालयात उपचार मिळाले असते, तर मोहितचा जीव वाचू शकला असता, असे कुटुंबीयांनी म्हटले आहे.