वॉशिंग्टन – अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने दोन वेगवेगळ्या प्रकारांच्या चिनी कंपन्यांना काळ्या यादीमध्ये टाकले आहे. यामधील पहिला गट हा लष्करी तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांचा असून दुसरा गट चीनमधील अल्पसंख्यांक मुस्लिमांना नियंत्रणात ठेवण्यात हातभार लावणारा आहे.
चीनच्या पश्चिमेकडील शिन्झियांग उघ्युर स्वायत्त भागात मानवाधिकारांचे कथित उल्लंघन केल्याबद्दल अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने 6 संस्थांना काळ्या यादीत टाकले आहे. या भागात तंत्रज्ञानाच्या आधारे टेहळणी करणाऱ्या 7 कंपन्यांनाही अमेरिकेने काळ्या यादीत टाकले आहे, अशी माहिती वॉल स्टीट जर्नलने दिली आहे.
त्या व्यतिरिक्त चीन, हॉंगकॉंग आणि केमान बेटांवर कार्यरत असलेल्या सरकारी आणि खासगी अशा 24 संस्थांनाही काळ्या यादीत टाकण्यात आले अहे. या कंपन्या लष्करी सामग्रीच्या खरेदी व्यवहारातील अग्रगण्य समजल्या जात आहेत. या सर्व 33 कंपन्या आणि व्यक्तींकडून राष्ट्रीय सुरक्षेच्या धोका असल्याच्या कारणावरून काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
या कंपन्यांशी व्यवसाय करणाऱ्या अमेरिकेतील कंपन्यांना जबरी दंड किंवा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे वाणिज्य विभागाने म्हटले आहे.