पिंपरी – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयातून शुक्रवारी (दि. 15) करोनामुक्त झालेल्या 80 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीला घरी सोडण्यात आले. तर, आज आणखी एका 49 वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.
करोनामुक्त झालेली व्यक्ती ही शिवाजीनगर, पुणे येथील रहिवाशी आहे. त्यांना उपचारासाठी 14 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर त्यांच्या करोनाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या. त्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
दरम्यान, गुरुवारी (दि. 14) करोनाची चाचणी घेतलेल्या व्यक्तीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. संबंधित व्यक्ती मंगळवार पेठ, पुणे येथील रहिवाशी आहे. आज नव्याने 7 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील हे रुग्ण आहेत.
रुग्णालयामध्ये आत्तापर्यंत भरती करण्यात आलेल्या एकूण 45 रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील 23 रुग्ण हे ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 7 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 10 करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 5 जण हे अत्यवस्थ आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश रोकडे यांनी दिली.