कराड – सध्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचा प्रभाव मलकापूरवर सुद्धा झाला आहे. मलकापूरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कराड शहर पोलीस स्टेशन, महसूल विभाग व मलकापूर नगरपरिषद यांच्यावतीने शहरामध्ये भिलवाडा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पॅटर्न मलकापूरसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी व्यक्त केला.
भिलवाडा पॅटर्नच्या अनुषंगाने भारती विद्यापीठ प्रांगणात सामाजिक अंतर ठेवून बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदिप वाकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, नगरसेविका आनंदी शिंदे, नगरसेवक राजेंद्र यादव उपस्थित होते.
सुरज गुरव म्हणाले, भिलवाडा पॅटर्नमुळे मलकापूर शहर करोना मुक्त होणे शक्य आहे. यामुळे शहरातील नागरिक अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडणार नाहीत. त्यामुळे त्यांचा संपर्क इतरांशी येणार नसल्याने याचा फायदा होणार आहे. या संकल्पनेमध्ये प्रभाग समिती निश्चित करावयाची आहे. यामध्ये नगरसेवक, पोलीस कर्मचारी, नगरपरिषद क्षेत्रीय अधिकारी व स्वयंसेवक यांचा समावेश असणार आहे. बी. आर. पाटील व उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.