पिंपरी- ढोल ताशाच्या गजरात करोना मुक्त झालेल्या रुग्णाचे स्वागत केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमय सुधीर नेरूरकर, कल्पेश गजानन हाने, संतोष शिवाजी वराडी आणि नगरसेविका मंगला कदम (सर्व रा. संभाजीनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस हवालदार गोविंद मधुकर गुरव यांनी गुरूवारी (दि. ३०) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगर परिसरात राहणारी एक महिला करोना मुक्त झाली. गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सदर महिला आपल्या घरी परत आली. त्यावेळी आरोपींनी आपसात संगनमत करून सदर महिलेचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. करोना प्रसाराचा धोका आणि जमावबंदीचा आदेश असतानाही आरोपींनी गर्दी जमवून प्रशासनाने दिलेल्या आदेशाचा भंग केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक अन्सार शेख याबाबत अधिक तपास करीत आहेत.