बंगळूर -लॉकडाऊनची मुदत किमान दोन आठवड्यांनी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, मुदतवाढ मिळालेला लॉकडाऊन आधीपेक्षा वेगळा ठरण्याची शक्यता आहे. त्यातून प्रामुख्याने कृषि आणि औद्योगिक क्षेत्रांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी संबंधित सूतोवाच केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यानंतर येडियुरप्पा बंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
लॉकडाऊनच्या मुदतवाढीशी निगडीत मार्गदर्शक तत्वे, नियमांची माहिती केंद्र सरकार दोन दिवसांत देईल. पुढील पंधरवड्यात लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचे संकेत मोदींनी दिले. त्यांनी राज्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली, असे येडियुरप्पा यांनी म्हटले.