आंबेगाव तालुक्यात महावितरणने 71 शाळांचा वीजपुरवठा केला खंडित
मंचर- आंबेगाव तालुक्यांतील सुमारे 71 जिल्हा परिषद शाळांची वीज महावितरण कंपनीने खंडित केली असून, या शाळांकडे एकूण सुमारे 6 लाख 81 हजार रुपये वीजमंडळाला देणे असल्याचे समोर आले आहे. ऐन उन्हाळ्यात आणि परीक्षांच्या काळात ही कारवाई करण्यात आली असल्याने शाळा प्रशासन हैराण झाले असून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांसमोर खासगी शाळांचे आव्हान आहे, त्यासाठी जिल्हा परिषद शाळांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती प्रयत्न करतात. जिल्हा परिषदेच्या शाळा डीजिटलही होत आहेत. मात्र, दुसरीकडे शाळांचा वीजपुरवठा वीज बिल थकबाकीमुळे आंबेगाव तालुक्यातील सुमारे 71 शाळांची वीज महावितरण कंपनीने बंद केली आहे.
महावितरणने केलेल्या या कारवाईमुळे आंबेगाव तालुक्यातील या शाळांमधील स्मार्ट एलईडी टीव्ही, ई लर्निंग प्रोजेक्टर, स्पीकर व्यवस्था बंद पडली आहे.
दुपारी कडक उन्हामुळे फॅन असून वापरता येत नाही. शाळेत झेरॉक्स मशीन असून बाहेर वाढीव दराने पैसे देऊन झेरॉक्स काढावी लागत आहे. संगणक संच असून वापरता येत नाहीय. परीक्षा पेपर, उपक्रम कागद, शालेय माहिती संगणकावर तयार करता येत नाही. परिपाठासाठी सकाळी स्पीकर वापरता येत नाही, तसेच शाळेचे काही सांस्कृतिक कार्यक्रम, जयंती, पुण्यतिथी स्पीकरविना घ्यावे लागत आहेत. संगणकावर विद्यार्थी जे शिक्षण घेतात ते बंद पडले आहे. पंखे बंद असल्याने 30 ते 35 डिग्री सेल्सिअसच्या उकाड्यात विद्यार्थ्यांना शिकावे लागत आहे
- द्यार्थी उकाड्याने हैराण
गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक शाळांनी वीज बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित केला गेला आहे. सध्या तापमान वाढत असून पंखे बंद असल्याने विद्यार्थ्याना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.तापमान जास्त असल्याने लहान विद्यार्थ्यांना उष्माघातासारख्या आजारांचा धोका नाकारता येत नाही. - तालुक्यातील 71 जिल्हा परिषद शाळांचा वीजपुरवठा वीजबिल न भरल्याने बंद आहे. सुमारे 6 लाख 81 हजार रुपये वीजमंडळाला देणे आहे. याबाबत जिल्हा परिषदेकडे शाळांचा वीजपुरवठा बंद असल्याचा अहवाल पाठवला आहे.लवकरच याबाबत कार्यवाही करुन वीजपुरवठा पुर्ववत केला जाईल.
– पोपटराव महाजन, गटशिक्षण अधिकारी
– रामदास पालेकर, विस्तार अधिकारी