त्रिसूर – परदेशगमन करून मायदेशी परतलेल्या वयोवृद्ध दांपत्यास कोरोनाच्या भीतीने शेजाऱ्यांनी घरात डांबून ठेवल्याचा अमानुष प्रकार केरळमध्ये उघडकीस आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, केरळातील त्रिसूर येथील रहिवाशी असलेले वयोवृद्ध दांपत्य काल सौदी अरब येथून भारतात परतले होते. नियमांप्रमाणे त्यांची विमानतळावर तपासणी देखील करण्यात आली. या चाचणीत कोरोना संदर्भातील लक्षणं न आढळल्याने त्यांना घरी जाण्याची मुभा देण्यात आली. मात्र असं असताना देखील या वयोवृद्ध दांपत्याला त्यांच्या शेजाऱ्यांच्या अज्ञानामुळे नाहक त्रास सहन करावा लागला.
हे दांपत्य त्यांच्या सदनिकेमध्ये पोहोचले असता शेजाऱ्यांनी त्यांच्या दारास बाहेरून कुलूप ठोकून त्यांना घरामध्ये कोंडून ठेवले. सदर वयोवृद्ध दांपत्याचा घरकामगार बाहेरून भाजीपाला घेऊन आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने त्यांनी पोलिसांशी संवाद साधून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.
दरम्यान, सोसायटीतील इतरांकडून त्या वृद्ध दांपत्यास कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवत अटक केली. परदेशावरुन परतणाऱ्या सर्व नागरिकांची विमानतळावर तपासणी होत असून त्यांच्यामध्ये कोरोना संदर्भातील कोणतीही लक्षणं आढळल्यास त्यांची रवानगी विलगता गृहामध्ये करण्यात येत आहे. परदेशातून परतलेल्या ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत त्यांना घरी सोडण्यात येत असलं तरी त्यांना इतरांशी संपर्क साधण्यास मज्जाव करण्यात आला आहे. देशामध्ये पसरत असलेल्या कोरोना विषाणूमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र असं असलं तरी परदेशातून परतलेल्या नागरिकांना अशाप्रकारे त्रास देण्याचा हक्क इतर नागरिकांना नाही.