लोणी काळभोर- कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामदैवत काळभैरवनाथाच्या यात्रेतील कुस्त्यांच्या आखाड्यातील 2,51,000 रुपये रोख व चांदीची गदा बक्षीसाची पहिल्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे याने जिंकली. पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ देवाची यात्रा नुकतीच पार पडली. या वार्षिक उत्सवाची सांगता निकाली कुस्त्याच्या जंगी आखाड्याने झाली.
यात उपमहाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे व हिंद केसरी राजू तोमर यांच्यात दोन लाख एक्कावन हजार व एकचांदीची गदा ही पहिल्या क्रमांकासाठीची कुस्ती झाली. हा जंगी आखाडा पंचक्रोशीतील सर्व कुस्ती शौकिनांना एक मोठी पर्वणीच ठरला. या आखाड्यात महाराष्ट्रातील नामांकीत मल्लांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे सर्व कुस्त्या निकाली होत्या. या आखाड्यात मल्लांना सुमारे पंधरा लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच मानाच्या पाच कुस्त्यांमधील विजेत्यास चांदीची गदा देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यांचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे चेअरमन संदीप धुमाळ, माजी सरपंच सचिन तुपे, संतोष कुंजीर, माजी उपसरपंच दत्तात्रय कुंजीर, दिलीप कुंजीर, राहुल धुमाळ, शिवाजी कुंजीर, भाऊसाहेब कुंजीर, राष्ट्रवादी युवकचे संग्राम धुमाळ, सिद्धांत तुपे, महेंद्र कुंजीर, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, प्रकाश तुपे, अजित धुमाळ, पंडित झेंडे, नीलेश धुमाळ, दीपक खटाटे, अमोल धुमाळ, विकास झेंडे, विशाल धुमाळ, अनंता कुंजीर व उत्सव कमिटी सदस्य उपस्थित होते. या आखाड्यात एकूण निकाली पंधरा कुस्त्या झाल्या. यासाठी पंच म्हणून महेंद्र कुंजीर, नीलेश खटाटे यांनी काम पाहिले.