बॉलिवूडमध्ये सध्या बिग बजेट चित्रपटांची खूपच चलती आहे. यंदाच्या वर्षात अक्षय कुमार, सलमान खान यासारख्या सुपरस्टार्सचे अनेक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सलमान खानचा “राधे’ यंदाच्या ईदला प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे अक्षय कुमारचे “लक्ष्मी बॉम्ब’, “सूर्यवंशी’ असे दोन चित्रपट वर्षभरात प्रदर्शित होत आहेत, पण आता अक्षय कुमारमुळे सलमान खानच्या समोरील अडचणी वाढल्या आहे.
सलमानचा “राधे’ आणि अक्षय कुमारचा “लक्ष्मी बॉम्ब’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. “राधे’ चित्रपटाच्या मेकर्सनी हा चित्रपट ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते, पण आता “लक्ष्मी बॉम्ब’ सुद्धा याच दिवशी प्रदर्शित
होणार आहे.
त्यामुळे सलमानच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण मागच्या वर्षी सलमानच्या तुलनेत अक्षय कुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरस ठरले होते. त्यामुळे आता हे दोन्ही अभिनेते रिलीज डेटच्या बाबतीत तडजोड करतात की हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.