न्यायालयाने फेटाळली याचिका
चेन्नई : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचे खासदारपुत्र कार्ती यांना करचुकवेगिरीशी संबंधित एका प्रकरणी दिलासा मिळू शकला नाही. संबंधित प्रकरणातून आरोपमुक्त करण्याची विनंती करणारी कार्ती यांची याचिका मंगळवारी तामीळनाडूतील विशेष न्यायालयाने फेटाळून लावली.
कार्ती आणि त्यांच्या पत्नी श्रीनिधी यांनी काही वर्षांपूर्वी चेन्नईजवळची एक जमीन विकली. त्या व्यवहारातून त्यांना कोट्यवधी रूपये मिळाले. मात्र, त्या व्यवहारानंतर कार्ती आणि त्यांच्या पत्नीने करचुकवेगिरी केल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे. ते प्रकरण आता न्यायालयात पोहचले आहे.
कार्ती आणि त्यांच्या पत्नीने करचुकवेगिरीचा आरोप फेटाळून आरोपमुक्त करण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली. मात्र, त्यांच्या विरोधातील पुराव्याला महत्व देत न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. कार्ती आणि त्यांच्या पत्नीविरोधात आरोप निश्चिती करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. तसेच, त्या दाम्पत्याला 21 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. पुढील सुनावणीस हजर न राहिल्यास वॉरंट जारी करण्याचा इशारा न्यायालयाकडून देण्यात आला.