महाविकास आघाडीसाठी ठरले “लकी चार्म’
पुणे – विधानसभा सभागृहात शनिवारी( दि. 30) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी क्रमांकाचा आलेल्या योगामुळे पुरंदर विधानसभा मतदासंघाचे कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप एकच चर्चेचा विषय ठरले, त्यामुळे जगताप हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी “लकी चार्म’ ठरले अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
महाविकास आघाडी सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी शनिवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडले. यासाठी हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून आंबेगाव विधानसभेचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती केली होती. वळसे पाटील यांनी बहुमत ठरावावर संख्येवर आधारित मतदान घेण्यात येत असल्याची घोषणा सभागृहात केली आणि त्यानुसार ठरावासाठी अनुकूल असलेल्या आमदारांची गणती सुरू केली. या गणतीत प्रत्येक आमदाराने स्वतःचे नाव आणि अनुक्रमांक सभागृहात उभे राहून सांगितले.
सरकारवरील विश्वासदर्शक ठराव बहुमताच्या जादुई आकडा 144 होता. त्यातच मी संजय जगताप 144 असे त्यांनी उच्चारताच, सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आणि सत्ताधाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला, यामुळे योगायोगाने जगताप यांचा आलेला 144 नंबरमुळे ते आज चर्चेचा विषय ठरले.
अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट –
महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 सदस्य आहेत. त्यामुळे क्रमांक 144 हा निर्णायकी आकडा आहे. कारण बहुमतासाठी 145 आमदारांचा आकडा सोबत असणे गरजेचे आहे. तर संजय जगताप यांनी 144 आकडा उच्चारला आणि सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचे मत सभागृहाचे बनले आणि त्यामुळे जिंकल्याच्या आनंदात सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.