सर्व्हेक्षण सुरू; पन्नास जणांचे कनेक्शन तोडले
पिंपरी (प्रतिनिधी)- प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात पाणीबाणी सुरू असल्यावरून ओरड होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका पाणीपुरवठा विभागाने शहरातील अनधिकृत व्यावसायिक नळजोड शोधण्याची मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत पन्नासहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी खास सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून हॉटेल, कार वॉशिंग सेंटर, बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई आणखी कडक केली जाईल, असे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी बोलताना सांगितले.
महापालिकेने एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. त्यावरून शहरातील राजकीय, सामजिक क्षेत्रातून आयुक्त, प्रशासनावर टिकेची झोड उठविली जात आहे. अकार्यक्षम असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जात आहे. त्यानंतर महापालिका पाणीपुरवठा विभागाने शहरातील अनधिकृत नळजोड शोधण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे.
महापालिकेच्या नळ योजनेतून व्यावसायिक वापरासाठी अनधिकृतरित्या पाणी घेतले जाते. हे व्यावसायिक महापालिकेचे पाणी फुकट वापरून त्यावर पैसे कमवतात. परंतु, त्यातून पालिकेचे आर्थिक नुकसान होते. तसेच, रहिवाशी भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते. त्यामुळे या पध्दतीने चोरून व्यवसायासाठी पाणी वापरणाऱ्या आणि अनधिकृत नळजोड घेणाऱ्या पन्नास व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून त्यासाठी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षणात व्यावसायिक नळजोडांवर थेट कारवाई केली जाणार आहे. तर, रहिवाशी भागातील अनधिकृत नळजोड सापडल्यास जागेवरच ते अधिकृत करण्याची सोय केली जाणार आहे. तसी तरतूद अमृत योजनेमध्ये आहे. त्यांचे नावे अनामत रक्कम, दंड, विलंब शुल्काची रक्कम पाच हप्त्यांमध्ये टाकण्यात येऊन पाणीबील देण्यात येईल. ऐकापेक्षा जास्त नळजोड असल्यास ते तोडून त्यांच्याकडून दंडाची वसूल करण्यात येणार आहे. त्याची देखील प्रभावीपणे कारवाई केली जाणार असल्याचे मकरंद निकम यांनी सांगितले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला 25 नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. मात्र, त्यानंतर शहरातील काही भागातून अपुरा पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येतात. तर अनेक भागात गढूळ पाणी येवू लागल्याच्या तक्रारी आहेत. प्रामुख्याने काळेवाडी, पिंपळे सौदागार, रहाटणी, चिखली, भोसरी या भागातून तक्रारी असून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एकाही मोटारीवर कारवाई नाही
महापालिकेच्या पाईपला थेट मोटारी लावून पाण्याचा उपसा करण्याचा सर्रास प्रकार शहरात अनेक ठिकाणी सुरू आहे. आयुक्तांनी अशा पद्धतीने पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तात्काळ पथक नियुक्त करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र अशा पद्धतीची एकही कारवाई अद्यापपर्यंत करण्यात आलेली नसल्याची माहिती कार्यकारी अभियंता निकम यांनी दिली.