मुंबई – गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस -13’ हा रिअॅलिटी शो चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. अश्लीलता पसरविणे आणि देशाच्या सामाजिक नैतिकतेला इजा पोहचत असल्यामुळे ‘बिग बॉस -13’ या रिअॅलिटी शो करणी सेनेने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नसून करणी सेनेने सलमानच्या ‘गॅलेक्सी’ या निवासस्थानाबाहेर निदर्शने देखील केली.
मात्र, निदर्शने करणाऱ्या 20 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचसोबत सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हा शो हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रसुद्धा लिहिलं होतं.
‘बिग बॉस’चं तेरावं पर्व सध्या जोरदार चर्चेत असून सोशल मीडियावरही #BanBiggBoss हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. या तेराव्या पर्वात शोच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत आणि हे नियम प्रेक्षकांना रुचले दिसत नाही.