औद्योगिक न्यायालयाचे आदेश
नीरा- सोना अलाईज एम्प्लॉईज संघटनेने लोणंद येथील सोना अलाईज कंपनीच्या विरोधात औद्योगिक न्यायालय सातारा येथे खटला दाखल केला होता. सदर खटल्यामध्ये औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. दातीर यांनी कामगार संघटनेच्या सभासदांना 7 ऑक्टोबर 2019 पर्यत कामावर हजर करुन घेण्याचा आदेश दिला आहे.
लोणंद एमआयडीसीमधील सोना अलाईज कंपनीच्या कामगार संघटनेत 350 कायम कामगार असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, भोर तालुक्यासह हडपसर, येथील सुमारे 150 कायम कामगार आहेत. सोना अलाईज एम्प्लॉईज संघटनेचा कंपनीबरोबर असलेला करार 31 डिसेंबर 2017 रोजी संपल्याने सदर संघटनेने कंपनी व्यवस्थापनास रितसर मागणी पत्र देऊन पुढील करार करण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार कंपनी व्यवस्थापन व संघटना यांच्यामध्ये मागणी पत्राबाबत चर्चाही सुरू होती. परंतु, कंपनी व्यवस्थापन केवळ चालढकल करीत होते. त्यामुळे संघटनेने कंपनीला सप्टेंबर 2018 मध्ये व डिसेंबर 2018 मध्ये संपाची नोटीस दिली. याचा गैरफायदा घेऊन कंपनी व्यवस्थापनाने स्वतःहून उत्पादन प्रक्रिया बंद पाडून कामगारांच्यावर टाळेबंदी लादली, अशी तक्रार करून कामगार संघटनेच्या वतीने ऍड. रवींद्र जाधव यांनी औद्योगिक न्यायालय सातारा यांच्या कोर्टात खटला दाखल केला होता. यावर न्यायालयाने कामगारांना कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत.