गोपीचंद पडळकर यांची अजित पवारांवर टीका
बारामती- अजित पवारांची दादागिरी मोडून काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी मला बारामतीत पाठवले आहे. इंग्रजांनी जेवढा अन्याय-अत्याचार महाराष्ट्रावर केला त्याच्यापेक्षा जास्त अन्याय पवारांनी महाराष्ट्रावर केला आहे, अशी टीका भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी बारामती येथे केली .
भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनीदेखील शहरातून भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले . भाजपच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली एकच छंद गोपीचंद या घोषणेने बारामती शहरातील चौक दणाणले.
बारामती विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या रॅलीदरम्यान शहरातील भिगवण चौकात राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पडळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मात्र, भाजपचे नेते व कार्यकर्ते यांच्यात उत्साह संचारला उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शक्तिप्रदर्शन करण्यात आले. संपूर्ण शहरातून रॅली काढण्यात आली यावेळी “एकच छंद गोपीचंद’चा नारा कार्यकर्त्यांनी दिला. बारामती नगरपरिषदेने समोर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, ज्येष्ठ सहकार तज्ञ चंद्रराव तावरे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, रंजन तावरे ,रासपचे संदीप चोपडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गोपींचद पडळकर म्हणाले की, बारामतीत भाजपच्या उमेदवाराला विरोध केला जात आहे याचा प्रत्यय नुकताच शहरातील भिगवण चौकात आला भाजप कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे भाजपच्या उमेदवाराला बारामतीत त्रास दिला जातो मग संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीचे उमेदवार कसे उभे केले जातात? असा सवालही पडळकर यांनी यावेळी उपस्थित केला.