जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांची माहिती
जेजुरी- तीर्थक्षेत्र जेजुरी येथे खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पुढील पन्नास वर्षांपर्यंत नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे अडीचशे कोटींचा सर्वकष जेजुरी विकास आराखडा तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे, अशी माहिती जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
जेजुरी येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात राज्यमंत्री शिवतारे बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख दिलीप यादव, रामभाऊ झगडे, मनोहर भापकर, हरिभाऊ लोळे, उमेश गायकवाड, प्रसाद खंडागळे, महेश स्वामी, गणेश गाढवे, सुदाम शिनगारे, विकास पवार, भाऊसाहेब गायकवाड, रवी निंबाळक, राहुल चव्हाण, बाळू गोसावी आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
जेजुरी शहर विकास आराखड्यामध्ये वन, पुरात्व व बांधकाम खाते यांच्या वतीने विकास आराखड्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये कडेपठार मंदिर, खंडोबा गड परिसर सुशोभीकरण करणे, पालखी मार्गाची कामे, कऱ्हा नदीतीरावर भाविकांना स्नानासाठी घाट बांधणे, शहरातील भुयारी गटारे बांधणे आदी कामांचा सामावेश असल्याचे राज्यमंत्री शिवतारे यांनी सांगितले.
मेळाव्यात जेजुरी शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नेमणुका करण्यात आल्या. शहरप्रमुख विठ्ठल सोनावणे, उपशहर प्रमुख अमित भापकर, शहर संपर्कप्रमुख गणेश डोंबे, युवसेनेचे शहरप्रमुख कमलेश राऊत, उपशहर प्रमुख ओंकार फाळके, अनिकेत शेवाळे, विद्यर्थी सेना शहरप्रमुख अजय पठाण, महिला आघाडीप्रमुख सविता शिंदे, अलका बनकर, ज्योती चांदेकर, ऍड. विजया नाझीरकर यांना नेमणूक पत्रे देण्यात आली. यावेळी इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांना राज्यमंत्री शिवतारे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.