पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गोळीबाराच्या घटना गांभीर्याने घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे. मात्र तरीही गुन्हेगारी कमी होत नाही, बिबवेवाडीमध्ये झालेल्या वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे ही बाब पुन्हा प्रकर्षाने पुढे आली आहे. बिबवेवाडीत टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली.
एकमेकांकडे पाहणे आणि थुंकल्याच्या रागातून हा प्रकार घडला असून यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. गुरूवारी रात्री दुर्गामाता गार्डनजवळील गल्लीत हा प्रकार घडला. यात एक कार तसेच चार रिक्षांची तोडफोड करण्यात आली. तर, दुचाकी गाड्या ढकलून देत त्याचे नुकसान करण्यात आले.
याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात धोंडीराम महादेव रावळ (वय ५३ ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी शुभम नंदकिशोर सगरे (वय २४), रवी आनंद चव्हाण (वय १९) या दोघांना ताब्यात घेतले असून, सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात मागील आठवड्यात गोळीबाराच्या चार घटना सलग घडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तर दुसरीकडे सोन साखळी , घरफोडी आणि लुटमार करणार्या चोरट्यांनी देखील उच्छाद घातला आहे.
पोलीस लोकसभा निवडणूक आणि पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीत असतानाच हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली असून तिघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
प्राथमिक चौकशीत आमच्याकडे पाहून थुंकल्याने तसेच रागाने पाहिल्यावरून हा वाद झाल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या सहा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील एक सराईत गुन्हेगार असून बाकी अल्पवयीन मुले आहेत.- मोनजकुमार लोंढे, पोलीस निरीक्षक